दोन आठवड्यांपूर्वी महाविद्यालयाच्या ऑपरेशन थिएटरजवळ असलेल्या प्रसाधनगृहात सकाळच्या सुमारास शिंदे हे बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. शिंदे यांचा मृत्यू अकस्मात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. शिंदे यांच्यासमवेत शिक्षण घेणाऱ्या दोघा महिला डॉक्टरांविरुद्ध तसेच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याविरुद्धही तक्रार आहे. पोलिसांनी त्या दोघा महिला डॉक्टरांसह महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर, परिचारिका यासह अँटीरॅगिंग कमिटीच्या सदस्यांचे देखील जाबजबाब नोंदवून घेतल्याचे समजते.
शिंदे यांच्यावर मानसरोग तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याने त्यांचा मृत्यू कदाचित गोळ्या औषधांच्या ओव्हर डोस किंवा हृदयविकाराच्या झटक्याने देखील झाला असण्याची शक्यता पोलीससूत्रांनी वर्तविली आहे.पोलिसांनी नोंदविलेल्या जाबजबाबातून शिंदे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही शिंदे यांच्या मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा औरंगाबाद तसेच नाशिक येथील न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला मात्र त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.