स्थायीच्या सदस्याबाबत आयुक्त करणार निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:56 IST2019-03-28T00:55:48+5:302019-03-28T00:56:09+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडून निराकरण करून घेतले जाणार असून, त्यानंतरही संभ्रम असल्यास जिल्हा प्रशासनाकडून निराकरण करून घेतले जाणार आहे.

स्थायीच्या सदस्याबाबत आयुक्त करणार निराकरण
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडून निराकरण करून घेतले जाणार असून, त्यानंतरही संभ्रम असल्यास जिल्हा प्रशासनाकडून निराकरण करून घेतले जाणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपाची एक रिक्त जागा भरण्यासाठी सध्या हालचाली सुरू असून, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता असल्याने नगरसचिवांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती; मात्र निवडणूक आचारसंहितेच्या कलम २७ नुसार कार्यवाही असे पत्र देऊन जिल्हा प्रशासनाने नियमाचा अर्थ लावून योग्य तो निर्णय घेण्याचे काम महापालिकेकडेच सोपवून दिले. त्यामुळे नगरसचिव विभाग बुचकळ्यात पडला आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे हे रजा संपवून गुरुवारी (दि.२८) महापालिकेत रुजू होणार असून, आता त्यांच्याकडूनच याबाबत निराकरण करून घेऊन कार्यवाही केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
गमे यांच्याकडून निराकरण न झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नेमके काय करायचे, हे समजावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अगोदर पत्राचा योग्य अर्थ न लागल्याने बुधवारीच (दि. २७) नगरसचिव जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन काय करावे, याचे मार्गदर्शन घेणार होते.