शिंदे ग्रामपंचायतीत लाखोेंची अनियमितता चौकशी अहवाल सादर, कारवाईस विलंब
By Admin | Updated: February 25, 2015 00:28 IST2015-02-25T00:26:33+5:302015-02-25T00:28:05+5:30
शिंदे ग्रामपंचायतीत लाखोेंची अनियमितता चौकशी अहवाल सादर, कारवाईस विलंब

शिंदे ग्रामपंचायतीत लाखोेंची अनियमितता चौकशी अहवाल सादर, कारवाईस विलंब
नाशिक : शिंदे ग्रामपंचायतीत सन २००८-०९ या काळात सुमारे ८२ लाखांच्या भारत निर्माण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेत लाखो रुपयांची अनियमितता करण्यात आल्याच्या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या चौकशीत काही गंभीर आक्षेप तपासणी अधिकाऱ्यांनी नोंदविले आहेत. विशेष म्हणजे चौकशी अहवाल प्राप्त होऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र यावर तातडीने कारवाई करण्याऐवजी ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. रामकृष्ण झाडे यांच्या तक्रार अर्जानुसार २५ नोव्हेंबर २०१४ रोजी याबाबत अधिकाऱ्यांच्या एका पथकाने गावाच्या पाणीपुरवठा योजनेसह दप्तर तपासणी केली. त्यात अनेक मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतले आहेत. याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय पवार यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे ३४ मुद्द्यांचा सविस्तर चौकशी अहवाल पाठविला आहे. त्यात २००५/०६ ते २००७ पर्यंत स्थानिक क्षेत्र (ग्रामनिधी) जमेपेक्षा खर्च जादा असल्याचे दिसून येते. यावरून पंचायतीची आर्थिक स्थिती असमाधानकारक असल्याचे दिसून येते, असे पहिल्याच मुद्द्यात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने विवरणपत्रास मंजुरी घेतलेली नाही. त्यात ४ लाख ७२ हजार ७२४ रुपयांचा जादा खर्च दिसून येतो. तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मोबाइल टॉवर कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कर आकारणी करण्यात आलेली नाही यासह अनेक मुद्दे या तपासणी अहवालात समाविष्ट असल्याचे समजते. याबाबत गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)