देवमामलेदारांच्या स्मारक नूतनीकरणाचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:16 IST2021-02-02T21:31:36+5:302021-02-03T00:16:34+5:30
सटाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३) येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बागलाणचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली.

देवमामलेदारांच्या स्मारक नूतनीकरणाचा आज शुभारंभ
या सोहळ्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे यांचे बुधवारी सकाळी १० ला विशेष विमानाने आगमन होईल. यासाठी शहरालगत देवळा रस्त्यावर दोन हेलीपॅड उभारले आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरात प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून त्यांच्या सूचनांचे सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भांगरे यांनी यावेळी केले. हेलिपॅड, चिनार विश्रामगृह, स्मारक स्थळ, दगाजी चित्रमंदिर यांसह सर्व आवश्यक ठिकाणी पोलूस यंत्रणेचे विशेष पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आले असून या ठिकाणी सकाळी ९.३० वाजेनंतर प्रवेश बंद केला जाणार आहे. कार्यक्रमस्थळांच्या परिसरात सकाळी ९ वाजेपासून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शहरातील मोकाट जनावरांना त्यांच्या मालकांनी मोकळे सोडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगरसेवक मनोहर देवरे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, महावितरणचे मधुकर बोरसे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.