नाशिक शहरातील ५७५ धार्मिक स्थळांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:50 AM2018-11-25T00:50:43+5:302018-11-25T00:51:25+5:30

शहरातील ५७५ धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिल्याने संबंधिताना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाचे आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र भाजपा अंतर्गत श्रेयवाद सुरू झाला आहे.

 Relief to 575 religious places in Nashik city | नाशिक शहरातील ५७५ धार्मिक स्थळांना दिलासा

नाशिक शहरातील ५७५ धार्मिक स्थळांना दिलासा

Next

नाशिक : शहरातील ५७५ धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिल्याने संबंधिताना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाचे आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र भाजपा अंतर्गत श्रेयवाद सुरू झाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी संबंधिताना घेऊन याचिका दाखल करण्यापासून वकिलांचे शुल्क देण्यापर्यंत काम केल्याचे सांगितले जात असून सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच याचिकाकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले, असे सांगितले जात असल्याने सध्या हा श्रेयवाद वादाचा विषय ठरला आहे.
महापालिकेने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यानंतर त्याबाबत बरीच चर्चा होऊन धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत पंधरा दिवसांपूूर्वीच निकाल लागला आणि त्यामुळे संबंधित याचिकाकर्त्यांनी महापालिकेत पेढे वाटून जल्लोष केला. उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी विहित कार्यवाही नमूद केली तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावरील धार्मिक स्थळे नगररचना नियमानुसार दहा टक्के बांधकाम म्हणून अनुज्ञेय करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
यासंदर्भातील आदेश उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही जनहित याचिकेला दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनोद थोरात, कैलास देशमुख, नंदू कहार यांनी यश प्राप्त झाले असे त्यांनी सांगितले, तर दुसरीकडे आमदार फरांदे यांनी देखील सायंकाळी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली.
पाटील यांचा सत्कार
भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी या कामगिरीचे श्रेय दिनकर पाटील यांना देत त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करवून घेतला, तर गुरुवारी (दि.१२) स्थायी समितीच्या बैठकीत सभापती हिमगौरी आडके यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
वकिलांकडून फरांदे यांचे आभार
धार्मिक स्थळांच्या याचिकेचे कामकाज पाहणारे विधीज्ञ प्रवर्तक पाठक यांनी आमदार फरांदे यांचे आभार मानले असून, त्यांनी फरांदे यांनी पुरावे म्हणून दिलेली कागदपत्रे तसेच अन्य मदतीमुळेच हे शक्य झाल्याचे लेखीपत्रात नमूद केले आहे. रामायण येथे धार्मिक स्थळ संघटनांची पहिली बैठक आपणच घेतल्याचे स्मरण फरांदे यांनी करून दिले आहे.

Web Title:  Relief to 575 religious places in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.