Release water to Chanakapur right canal | चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडा

आमदार डॉ. राहुल आहेर यांना निवेदन देतांना सरपंच भाऊसाहेब आहेर, अनिल पगार, राहुल केदारे आदींसह मटाणे येथील ग्रामस्थ.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

मटाणे गावातील शेतकऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची देवळा येथे भेट घेऊन तालुक्यातील पाणीटंचाईबाबत माहिती दिली तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच वणवण भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून चणकापूर उजव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब आहेर, अनिल पगार, संभाजी पवार, भगवान आहेर, समाधान आहेर, राहुल केदारे, कैलास आहेर, योगेश आहेर, दादाजी आहेर, मनोज आहेर, गुलाब आहेर, कैलास बोरसे, पोपट पवार, विठोबा देवरे, सतीश देवरे, आबा आहेर, चंद्रकांत आहेर, अविनाश आहेर, जनार्दन पाटील, संजय आहेर, शरद वाघ, शैलेंद्र आहेर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा
परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही, अशा तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. दरम्यान, दोन-तीन दिवसात कालव्याला आवर्तन सोडण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले.
 

Web Title: Release water to Chanakapur right canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.