पाणी कपातीस आयुक्तांचा नकार आढावा बैठक : धरणात पुरेसा पाणी साठा
By Admin | Updated: May 7, 2014 21:59 IST2014-05-07T21:18:25+5:302014-05-07T21:59:43+5:30
नाशिक : गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा असल्याने नाशिक शहरात पाणीकपात करण्यास आयुक्त संजीव कुमार यांनी नकार दिला आहे.

पाणी कपातीस आयुक्तांचा नकार आढावा बैठक : धरणात पुरेसा पाणी साठा
नाशिक : गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा असल्याने नाशिक शहरात पाणीकपात करण्यास आयुक्त संजीव कुमार यांनी नकार दिला आहे. बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
यंदा पावसाळा विलंबाने सुरू होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात सामान्यत: जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणी साठा असतो. परंतु विलंबाने पावसाळा सुरू झाला, तर पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. असे होऊ नये यासाठी महापालिकेने यापूर्वी दोन-तीन वर्षांपासून पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन वीस ते पन्नास टक्के कपात केली होती. त्यामुळे यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक महापालिकेलाही असाच निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात टिप्पणी तयार करून तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांना सादर केले होती. परंतु त्यांची बदली झाल्याने हा विषय रखडला होता. आज यासंदर्भात प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांनी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाणी आरक्षण मंजूर केले आहे. त्यानुसार पुरेसा साठा असल्याने पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार उपस्थित होते. दरम्यान, सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.