मागणी घटल्याने लाल कांद्याचे भाव घसरले

By Admin | Updated: February 6, 2016 22:27 IST2016-02-06T22:24:26+5:302016-02-06T22:27:44+5:30

आवक स्थिर : येवला बाजारात सरासरी ३०० रुपयांची घसरण

Reduced price of red onion dropped due to demand slump | मागणी घटल्याने लाल कांद्याचे भाव घसरले

मागणी घटल्याने लाल कांद्याचे भाव घसरले

येवला : पश्चिम बंगाल, गुजरात, चाकण सह पुणे परिसरातील टिकाऊ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून त्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने नाशिकसह परिसरातील लाल कांद्याची आवक स्थिर असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने, या कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले असून ही घसरण अशीच सुरू राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कांदा घसरणीच्या परिस्थितीमुळे मुळातच दुष्काळी छायेत असलेला शेतकरी आणखी नागवला जाणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
येवला मार्केट यार्डवर शनिवारी ५५० रिक्षा व ८० ट्रॅक्टरमधून ६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येवला मार्केट यार्डवर कांद्याचे बाजारभाव ४०० ते १०२७ रुपये पर्यंत असून सरासरी ८०० रु पये प्रती क्विंटल होते. सरसरी १२५० रु पये प्रती क्विंटल विकला जाणारा लाल कांदा भावात निरंतर घसरण झाल्याने ८०० रुपयापर्यंत आल्याने बळीराजा हताश झाला आहे. येवला तालुक्यात शेतकऱ्यांकडे सध्या १ लाख क्विंटल लाल कांदा शेत शिवारात असण्याचा अंदाज आहे.
नांदगाव, वैजापूर, कोपरगाव येथूनही येवला मार्केटला मोठ्या प्रमाणावर कांदा येत आहे. त्यामुळे कांद्याची आवक निरंतर स्थिर आहे. परंतु दिवसागणिक लाल कांद्याचे भाव घसरत आहे. नाशिक, नगर, जळगाव, चाळीसगाव, शिरपूर, नंदुरबार, या परिसरात नगदी पिकामुळे कांदा पीक लागवडीकडे आकर्षण वाढले
आहे.
इतर पिके सोडून बळीराजा कांदा पीक सर्वाधिक घेत असल्याने भरमसाठ उत्पन्न आहे. चाकण व पुणे भागातील फुरसुंगी कांदा व पश्चिम बंगालमधील गारवा कांदा हा नाशिक भागातील उन्हाळ कांद्यासारखाच टिकाऊ आहे. याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाल कांद्याची मागणी घटली आहे. याचा परिणाम म्हणून लाल कांद्याचे भाव घसरू लागले आहेत.
येवला तालुका दुष्काळी असल्याने पाणी नाही, म्हणून कांद्याचे पीक घेण्यासाठी तालुक्यातील शेतकरी गंगापूर, वैजापूर,
कन्नड, कोपरगाव, पैठणसह अन्य ठिकाणी २५ ते ३० हजार रुपये
ठेक्याने कांदा लागवड करण्यासाठी कुटुंबांसह गेले आहे. काही
शेतकरी तिसरा वाटा पद्धतीने अन्य ठिकाणी कांदा पीक घेत आहेत.परंतु कांद्याच्या भावात घसरण सुरु झाल्याने आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

Web Title: Reduced price of red onion dropped due to demand slump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.