रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना रंगेहात पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 01:59 IST2020-11-05T21:19:42+5:302020-11-06T01:59:53+5:30
घोटी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील रेशन दुकानातून २० गोणीतून रेशनिंगचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनासह ...

रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना रंगेहात पकडला
घोटी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील रेशन दुकानातून २० गोणीतून रेशनिंगचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनासह संशयितांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात गहू कट्टे, वाहन जप्त करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून खुल्या बाजारात रेशनचे धान्य विकणा-यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत घोटी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गुरुवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास वावीहर्ष ता. त्र्यंबकेश्वर येथील रेशन दुकानातून २० प्लास्टिक गोण्यातून प्रत्येकी ३५ किलो गहू ( बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत २० हजार रुपये) गावातीलच (एम एच १५ बीजे-३५६८) जीपमधून वैतरणाच्या दिशेने घेऊन जात असताना श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, सरपंच बाबुराव बांगारे, तालुकाध्यक्ष भगवान डोखे आदींनी पाळत ठेऊन गावाबाहेत पकडला.
त्यांनी त्र्यंबकेश्वर तहसील व घोटी पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती दिल्याने यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन मुद्देमाल व संशयितांना ताब्यात घेतले. पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांनी प्राथमिक स्थितीत हा गहू रेशनिंगचा असल्याचे नमूद करून याबाबत त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिरासे यांना माहिती दिली.
ऑक्टोबर महिन्यातील कार्डधारकांना वाटप झालेले धान्य वगळून उर्वरित वाटप न झालेले धान्य हे गोण्यात भरून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आदेशाचा भंग करून अवैध व विनापरवाना काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेला जात असताना अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गहू व २ लाख रुपये किमतीचे जीप हे वाहन पकडून जप्त करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर पुरवठा निरीक्षक रमजान तडवी यांच्या फिर्यादीवरून रेशन दुकान चालवित असलेल्या महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका हरी डहाळे, धान्य वाटप करणारा हरी शिवराम डहाळे, व जीपचालक संजय सीताराम कडलग यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे, हवालदार कडभाने, रवी जगताप, शीतल गायकवाड, सुहास गोसावी आदी करीत आहेत.