सटाण्यात इंधन दरवाढीविरोधात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:33 IST2020-12-15T17:32:27+5:302020-12-15T17:33:22+5:30
सटाणा :येथील महाआघाडीच्यावतीने इंधन दर वाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ( दि. १५) शहरातील बसस्थानकासमोर ठिय्या देऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सटाण्यात इंधन दरवाढीविरोधात रास्तारोको
केंद्रातील एनडीए. शासनाच्या काळात देशात पेट्रोल , डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. पर्यायाने देशात महागाईने कळस गाठला आहे . काही वर्षापूर्वी पेट्रोल व डिझेल तसेच घरगुती गॅस रास्त दरात ग्राहकांना मिळत होते . केंद्र शासनाने देशात जीएसटी कर प्रणाली लागू करुनही शासनाची तिजोरी भरण्यासाठी सोयीस्करपणे पेट्रोल , डिझेल व इतर इंधनास जीएसटीमधून वगळले आहे. ग्राहकांकडून या इंधनापोटी भरमसाठ रक्कम वसूल केली जात असून निम्म्याहून अधिक रक्कम केंद्र शासनाच्या तिजोरीत वळविली जाते. ही देशातील जनतेची शुध्द फसवणूक असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध करीत शहरातील बसस्थानकासमोर रास्तारोको केला. अर्ध्या तासानंतर आपल्या मागणीचे निवेदन पोलिसांना सादर करुन आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात शिवसेनेचे लालचंद सोनवणे, तालूका प्रमुख सुभाष नंदन, जयप्रकाश सोनवणे, शरद सोनवणे, काँग्रेसचे किशोर कदम, राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, रत्नाकर सोनवणे, दादू सोनवणे, सुमित वाघ, एजाज शेख, लक्ष्मण सोनवणे आदी सहभागी झाले होते.