'त्या' क्रूर अमानवी घटनेचा रांगोळीतून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:16 IST2020-06-05T17:00:57+5:302020-06-05T17:16:03+5:30
नाशिक : केरळमधील हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालून तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध आणि संतापही ...

'त्या' क्रूर अमानवी घटनेचा रांगोळीतून निषेध
नाशिक : केरळमधील हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालून तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध आणि संतापही व्यक्त केला जात आहे. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने अवघा देश थरथरला. सोशल मिडियावर नेते, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. अशाच पद्धतीने नाशिकची युवा रांगोळीकार पूजा बेलोकर व तिच्या सहकाऱ्यांनी सहा तास अविरत परिश्रम घेत ६ फूट रुंद व ८ फूट लांबीची रांगोळी रेखाटून या अमानवी कृत्याचा निषेध नोंदविला.
नाशिकमधील रविवार कारंजा येथील लोणार गल्लीत पूजा, ओमकार टिळे यांनी या क्रूर घटनेकडे आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. ४८ चौरस फुटाची रांगोळी काढण्यासाठी पूजा आणि ओमकारला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शिर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे.
केरळमध्ये हत्तीणीचा अशा पद्धतीने ‘खून’ करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आली आणि अवघा देश हादरला. सोशल मीडिया गहिवरून आला. सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. सर्वांनी या क्रूरतेला माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य म्हटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरांमधून पुढे आली. केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.