रामटेकडी वसाहत विविध समस्यांनी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:32 IST2019-06-01T00:32:00+5:302019-06-01T00:32:18+5:30
सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या नावाने खापर फोडले आहे.

रामटेकडी वसाहत विविध समस्यांनी त्रस्त
पंचवटी : सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या नावाने खापर फोडले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नगरसेवक केवळ प्रचाराच्या वेळेसच आले मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधी पुन्हा रामटेकडी वसाहतीत फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासींनी केला आहे.
रामटेकडी वसाहत सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपासून थाटली आहे. वसाहतीत जाणारे रस्ते काँक्रिटीकरण केलेले आहे. पथदीपदेखील बसविलेले आहेत. मात्र ड्रेनेज लाइन नसल्याने अनेकदा रस्त्यावर धुणी भांडी करताना सांडपाणीशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर वाहते. त्यामुळे वारंवार महिलांमध्ये भांडणे होतात. पथदीप बसविलेले असले तरी काही पथदीप बंद आहेत. अरुंद रस्ते असल्याने या भागात आत्तापर्यंत घंटागाडी आलेलीच नाही त्यामुळे नागरिकांना कचरा नदीपात्राकडे फेकावा लागतो अरुंद रस्ता असल्याने रामटेकडी भागात कचरा जमा करण्यासाठी तीनचाकी सायकल घंटागाडी सुरू केली पाहिजे.
परिसरात एक ते दोन महिन्यांने औषध फवारणीसाठी कर्मचारी येतात मात्र ते कर्मचारी औषध फवारणी न करता केवळ नागरिकांच्या सह्या घेऊन जातात. परिसरातील नागरिकांसाठी सुलभ शौचालय असले तरी त्याची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन शौचालय संख्या वाढविणे गरजेचे आहे. परिसरातील सर्वच घराच्या छतावरून धोकेदायक ंवीजतारा गेल्याने पावसाळ्याच्या कालावधीत पत्र्यांच्या घरांमध्ये वीजप्रवाह उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या भागात ड्रेनेज लाइन असल्याने सांडपाणी तसेच पावसाळ्यात रस्त्याने वाहणारे पाणी कधीकधी नागरिकांच्या घरात जाते. त्यामुळे ड्रेनेज लाइन टाकणे गरजेचे आहे. याशिवाय रामटेकडी प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत नसल्याने लहान मुले खेळताना खाली पडण्याची शक्यता आहे. वसाहतीला लागूनच नदीपात्र असल्याने अनेकदा या नदीपात्राची दुर्गंधी पसरते नियमित औषध फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शौचालय संख्या अपुरी असल्याने तसेच साफसफाई होत नसल्याने लहान मुलांना तर कधी महिलांना उघड्यावरच जावे लागते.
(उद्याच्या अंकात : इंदिरानगर झोपडपट्टी, कॅनलरोड, जेलरोड)