Rambhakta will bow on the feet | पादुकांवर रामभक्त होणार नतमस्तक

पादुकांवर रामभक्त होणार नतमस्तक

ठळक मुद्दे रामकुंडावर गंगा गोदावरी मंदिराच्या ठिकाणी बुधवारी (दि.५) सकाळपासून हे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अयोध्येतील राममंदिराचे निर्माण हा स्वप्नपूर्तीचा दिवस असला तरी त्याठिकाणी मात्र भाविकांना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे अयोध्येहून आणलेल्या पादुकांचे पूजन करून नाशिकमधील रामभक्त नतमस्तक होणार आहे. याशिवाय दुपारी गोदाकाठीच आरतीदेखील करण्यात येणार आहे.
पंचकोटी पुरोहित संघ, विश्व हिंदू परिषद, धर्मसभा आणि वारकरी संप्रदाय अशा विविध संस्थांच्या नाशिकमध्ये रामकुंडावर गंगा गोदावरी मंदिराच्या ठिकाणी बुधवारी (दि.५) सकाळपासून हे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात वाजेपासून दर अर्ध्या तासाने याठिकाणी विविध घटक संस्थाचे रामभक्त प्रातिनिधीक स्वरूपात येऊन याठिकाणी पादुकांचे पूजन करतील. सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून हे धार्मिक कार्यक्रम होतील, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.
नाशिकमध्ये अनेक राम मंदिरे असले तरी गोदाकाठी खुल्या स्वरूपात कार्यक्रम करता आला असता. परंतु तो करता येणार नाही. त्यामुळे अशाप्रकारचे नियोजन करण्यात आली आहे. नाशिक ही रामभूमी आहे. रामतीर्थ त्यामुळेच पावनदेखील आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी असलेल्या पादुका अयोध्येतून आणण्यात आल्या आहेत. अयोध्येतील एका महंतांनी ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्याला होते, त्या सर्व ठिकाणी भेट देऊन पादुका भेट दिल्या होत्या. त्या पादुकांवरच नाशिकचे रामभक्त नतमस्तक होणार आहेत, असे शुक्ल यांनी सांगितले.

Web Title: Rambhakta will bow on the feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.