Rain exposure, speed up farming | पावसाची उघडीप, शेतकामांना वेग

पावसाची उघडीप, शेतकामांना वेग

ठळक मुद्दे गाव, पाडे वस्त्यावर शुकशुकाट

अभोणा : शहर परिसरासह पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खोळंबलेल्या शेतकामांना वेग आला आहे. पंधरवड्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने शहर परिसरात काढणीस आलेली बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या सोंगणीस वेग आला असतानाच चार दिवसांपूर्वी परिसरात परतीच्या मुसळधारेने शेतात उघड्यावर कापून पडलेल्या पिकांचे पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाले.

सध्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शिवारात सोंगणी झालेले सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग आदी पिकांचे गंज वाळविण्यासाठी उन्हात ठेवण्याची लगबग सुरु आहे. सोयाबीन आहे त्या स्थितीत मशीनद्वारे काढून घेतला जात आहे. दर्जेदार व टिकाऊ उन्हाळ कांदा उत्पादनासाठी ओळख झालेल्या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात यंदा कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची चिन्हे असून, शेतकरी मिळेल त्या दराने कांदा बियाणे खरेदी करून शेतात बियाणे टाकण्यासाठी जमीन तयार करणे, वाफे पाडणे, घाणकचरा वेचून जमीन निर्मळ करणे या कामांमध्ये व्यस्थ आहेत.

कोरोनाच्या संकटात मजुरांची टंचाई भासू लागल्याने यंदा शेतशिवारात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिवसभर शेतातच राबताना दिसू लागल्याने गाव, पाडे वस्त्यावर शुकशुकाट आहे. गेल्या वर्षी पोळा ते दिवाळीपर्यंत अधूनमधून पावसाने दणका देत कांदा रोपांची वाताहत केल्याने शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिसºयांदा रोप टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे जबर आर्थिक फटका तर बसलाच त्याबरोबरच कांदा लागवडही लांबणीवर पडली होती. हा अनुभव जमेस धरून यंदा शेतकरी रोप टाकण्यासाठी सावधपणे निर्णय घेताना दिसत आहेत.

Web Title: Rain exposure, speed up farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.