वातावरणातील बदलामुळे रब्बी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST2020-12-25T20:46:56+5:302020-12-26T00:38:59+5:30
सायखेडा : जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी धुके पसरत असले तरी ऐन हिवाळा असूनही केवळ कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण अद्याप सुरू आहे. याचा फटका रब्बीतील पिकांवर होत असून, गहू, हरभरा, ज्वारी पिके संकटात आली आहेत. एकीकडे वातावरणातील बदलांमुळे पीक अडचणीत आले असताना दुसरीकडे पिकांवर अळीचे आक्रमण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनके ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट गहिरे झाले आहे.

वातावरणातील बदलामुळे रब्बी अडचणीत
यंदा म्हणावा तसा हिवाळा अद्याप सुरू झालेला नाही. डिसेंबर अर्ध्याहून जास्त उलटून गेल्यानंतरही वातावरणात आवश्यक बदल झालेला नाही. शेतकऱ्यांनी खरिपातील मका पीक काढणीनंतर गहू, हरभरा, तूर, कांदा, लसूण आदी पिकांची मोठ्या उत्साहाने लागवड केली; मात्र वातावरणातील बदलामुळे ही पिके धोक्यात येत आहेत. या बदलामुळे सध्या गहू पिवळा पडू लागला आहे. त्याची वाढही खुंटली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. यानंतर मातीतील ओलावा निघून जाण्यास बराच अवधी लागल्याने पेरण्या उशिराने झाल्या होत्या. यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा शेतकरी धरून होते; परंतु अद्याप वातावरणात आवश्यक गारवा निर्माण झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शेतकऱ्यांनी खरिपानंतर जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने टोकन पद्धतीने गव्हाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गहू पेरला; मात्र वातावरण साथ देत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊन-सावलीच्या खेळात गहू पिवळा पडू लागला आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी रब्बी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत. सध्या सकाळी बऱ्याच वेळ धुके, दुपारच्या वेळी ऊन तर संध्याकाळी साधारण थंडी पडत आहे. हा बदल रब्बी पिकांसाठी त्रासदायक असल्याचे बोलले जाते. जाणकारांच्या मते, या अवस्थेत पिके करपतात, रोग पडण्याच्या आधीच्या अवस्थेत रोगाच्या चिपट्यादेखील करपतात. हरभरा सध्या फुले येण्याच्या अवस्थेत आहे. त्यास धुक्याचा विपरित परिणाम घडत असतो.
किडींचाही धोका वाढला!
पर्यावरणातील असमतोलामुळे एकीकडे पिकांची वाढ खुंटली असताना दुसरीकडे किडींचाही प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. पेरणी केलेल्या गहू पिकाने आता डोके वर काढले असताना अळीचे आक्रमण सुरू झाले आहे. या अळीने फुलांना पोखरण्याचे काम सुरू केले असल्याने अनेक कोंब जागेवरच गळून पडत आहेत. गहू आणि हरभऱ्याची सारखीच स्थिती आहे.