राज्यात प्रत्येक शहरात इंटिग्रेटेड बसपोर्ट : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:30 IST2017-07-30T22:15:33+5:302017-07-30T22:30:52+5:30

राज्यात प्रत्येक शहरात इंटिग्रेटेड बसपोर्ट : फडणवीस
नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. १५ कोटी रुपयांच्या या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करून एक एसपीव्ही स्थापन केली जाईल आणि त्यामाध्यमातून बसपोर्ट उभारले जातील. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुंबई- अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करताना महाराष्टÑात या प्रकल्पाला जागा दिली जाईल, परंतु नाशिकला थांबा द्यावा, ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईल, असेही ते म्हणाले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असून, जेएनपीटीचे अंतर कमी होणार आहे. केंद्रसरकार नाशिकला ड्रायपोर्ट साकारणार असल्याने दोन ते अडीच तासांत औद्योगिक व शेतमाल जेएनपीटीपर्यंत निर्यातीसाठी पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.
गुजरातला मल्टी ट्रान्सपोर्ट रेल्वे स्टेशन सुरू झाले, त्या धर्तीवर देशभरातील शंभर स्टेशनचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील बसस्थानकावर आता नाशिकचा भाजीपाला मिळू शकेल, असेही ते म्हणाले.