सुरगाण्यात मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:33 IST2020-11-27T00:32:39+5:302020-11-27T00:33:41+5:30
सुरगाणा येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने येथील दोन भावांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरगाण्यात मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की
सुरगाणा : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने येथील दोन भावांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीचे कामकाज सुरू असताना एक वाजेच्या सुमारास येथील युवक रूपेश राजेंद्र कानडे व पुष्पक राजेंद्र कानडे यांनी येथील मुख्याधिकारी नागेश येवले कार्यालयात शासकीय कर्तव्य पार पाडत होते. काही कारणावरून कानडे बंधूंकडून शासकीय कामात अडथळा निर्माण करून येवले यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी देऊन काम करण्यास रोखले. येवले यांची खासगी कार (एमएच-१२ एनपी- ५३६९) या गाडीच्या बोनेटवर तसेच दरवाजावर लाथा बुक्क्यांनी प्रहार केले आहे. यावेळी एकच गोंधळ झाल्याने गर्दी झाली होती. याप्रकरणी येवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोघां भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व ठाणे अंमलदार सदाशिव गांगुर्डे हे पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.