आउटसोर्सिंगच्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:48 IST2019-10-30T23:48:02+5:302019-10-30T23:48:36+5:30
महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली.

आउटसोर्सिंगच्या विरोधात निदर्शने
नाशिक : महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या सेल्फी हजेरीसदेखील विरोध करण्यात आला असून, यासंदर्भात प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.
शासनाकडे १४ हजार कर्मचाऱ्यांच्या जागांचा आकृतिबंध पाठविण्यात आला असून तो मंजूर करण्याऐवजी आउटसोर्सिंगचा पर्याय निवडला जात असल्याचा आरोप युनियनने गमे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. संघटनेचे नेते सुरेश मारू, सुरेश दलोड, ताराचंद पवार, कस्तुरी पवार, जिजा साळवे यांनी दिलेल्या निवेदनात सेल्फी हजेरीला कडाडून विरोध केला आहे. सफाई कामगारांची पदे मुळातच कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. बळजबरीने सेल्फी हजेरी घेतली जात असून त्यास विरोध असल्याने ही कार्यवाही त्वरित थांबवावी अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेत सफाई कामगारांची संख्या कमी होत आहे. सध्या अवघे १९०० कर्मचारी असून त्यातील तीनशे कर्मचारी कामाच्या सोयीने अन्य विभागात काम करतात. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सफाई कामगारांची भरती करण्याऐवजी सरळ आउटसोर्सिंगने कामे करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा होऊनही उपयोग झालेला नाही.