सिन्नर तालुक्यात श्रमदानासाठी जलमित्रांचे प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 17:24 IST2019-04-20T17:22:32+5:302019-04-20T17:24:16+5:30
सिन्नर : तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल ९० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तालुक्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, या कामाचा जोर वाढविण्यासाठी सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे, तसेच अन्य लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन येथील जलमित्रांनी केले आहे.

सिन्नर तालुक्यात श्रमदानासाठी जलमित्रांचे प्रोत्साहन
तालुक्यातील ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा दाह सोसला आहे. परिणामी सर्वांनाच पाण्याचे महत्व कळाले असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे १२८ पैकी सुमारे ९० गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गावांनी सहभाग घेतला असला तरी त्यात ग्रामस्थांचा श्रमदानाच्या माध्यमाने सक्रीय सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जलमित्रांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: विविध गावांमध्ये जाऊन श्रमदान करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून स्थानिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मित्र मंडळी, नातेवाईक, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, मित्र मंडळे, खासगी संस्था यांनी एकत्र येऊन समाजाचा घटक म्हणून श्रमदानात सहभागी होण्याची गरज जलमित्रांनी व्यक्त केली आहे.