पुरोगामी-प्रतिगामीत द्वंद्व
By Admin | Updated: August 1, 2015 23:30 IST2015-08-01T23:07:52+5:302015-08-01T23:30:57+5:30
जागर परिषदेवरून वाद : कार्यक्रम रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुरोगामी-प्रतिगामीत द्वंद्व
नाशिक : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रविवारी पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेपूर्वीच नाशकात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघटनांमध्ये चांगलीच जुंपली असून, सांगली येथे आव्हाड यांच्यावर याच परिषदेत हल्ला करण्यात आल्याची पार्श्वभूमी बघता पोलिसांनी आयोजकांनाच नोटिसा पाठवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी सोपविली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, यासाठी रविवारी सायंकाळी चार वाजता रावसाहेब थोरात सभागृहात शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद भरवण्यात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जितेंद्र आव्हाड युवा फाउंडेशन, पीपल्स रिपब्लिकन, आयटक, छावा मराठा युवा संघटना, पुरोगामी विचार मंच, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड अशा पुरोगामी संघटनांनी पुढाकार घेतला असून, या परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड, ज्ञानेश महाराव, श्रीमंत कोकाटे, प्रतिमा परदेशी हे विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत. सांगली येथे १९ जुलै रोजी अशाच प्रकारे जागर परिषद सुरू असताना प्रतिगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करून गोंधळ घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.