अनधिकृत सिलिंडर अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 00:58 IST2019-12-03T00:58:00+5:302019-12-03T00:58:37+5:30
वडनेररोडवरील हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळ लोकवस्तीमध्ये अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत सिलिंडर अड्ड्यावर छापा
नाशिकरोड : वडनेररोडवरील हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळ लोकवस्तीमध्ये अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी के. एल. सोनोने यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळील एका घराजवळ एक युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून संशयित पद्माकर शांताराम चव्हाण (३५) या युवकास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने वाहनधारक घरगुती गॅसची टाकी माझ्याकडे घेऊन येतात मी त्यांना गॅस भरून देतो, असे सांगितले. पोलिसांनी चव्हाण याच्या घराच्या पाठीमागील बाजूस लोखंडी अॅँगलवर फिट केलेला गॅस भरण्याचा २० हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक पंप व मोबाइल आढळून आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच अवैध धंदे विरोधी पथकाने विहितगाव पेट्रोल पंपासमोरील एका बंगल्याच्या आवारात छापा मारून अनधिकृत चालणारा घरगुती गॅसचा अड्डा उद्ध्वस्त करत १५० घरगुती गॅसच्या टाक्या जप्त करून कारवाई केली होती.