मुख्याध्यापक सक्तीने सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:33 IST2019-07-12T00:32:06+5:302019-07-12T00:33:19+5:30
शैक्षणिक व प्रशासकीय कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकास सक्तीने सेवानिवृत्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मुख्याध्यापक सक्तीने सेवानिवृत्त
नाशिक : शैक्षणिक व प्रशासकीय कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकास सक्तीने सेवानिवृत्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
इंदोरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांच्याबाबत गावातील पालक, ग्रामस्थ यांनी लेखी तक्रार दिली होती. तसेच पदाधिकाऱ्यांनीही याबाबत प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली होती. त्यानुसार पवार यांच्यावर शाळेचे प्रशासकीय काम असमाधानकारक असणे, शालेय पोषण आहारात अनियमितता, मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समन्वय नसणे, शाळा भेटीच्या वेळी अनुपस्थित असणे, अभिलेखे अद्ययावत नसणे याबाबत दोषारोपण बजावण्यात आले होते. तसेच याबाबत सहायक आयुक्त (चौकशी) यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली होती. चौकशीत आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सक्तीने सेवानिवृत्त का करू नये याबाबत प्रशासनाने अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने तसेच त्यांनी चौकशी काळातही असमाधानकारक काम केल्याने या संदर्भात शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पवार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी देत सक्तीने सेवानिवृत्त केले आहे.