जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: October 15, 2014 00:37 IST2014-10-15T00:05:47+5:302014-10-15T00:37:32+5:30
जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज
नाशिक : युती-आघाडी तुटल्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांच्या मनाचा ठाव न लागू देणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४२०८ केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, कर्मचारी साहित्यानिशी केंद्रांवर रवाना करण्यात आले, तर मतदान निर्भय व शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त व मदतीला केंद्रीय निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी १७३ उमेदवार असून, त्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार शिरीष कोतवाल, वसंत गिते, पंकज भुजबळ, नितीन भोसले, धनराज महाले, ए. टी. पवार, निर्मला गावित, माणिक कोकाटे, अनिल कदम, मौलाना मुफ्ती, दादा भुसे यांच्यासह माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार शिवराम झोले, नरहरी झिरवाळ, रामदास चारोस्कर, जिवा पांडू गावित, अनिल अहेर, दिलीप बनकर, दिलीप बोरसे हे राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रीय कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, जनता दल हे पक्ष स्वबळावर लढत देत असल्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत राजकीय डावपेच, व्यूहरचना व मतदारांना आपलेसे करण्याचा पुरेपूर प्रयत्न उमेदवार व त्यांच्या समर्थकांकरवी करण्यात येत आहे. या निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक शहरातील मध्य, पूर्व व पश्चिम या तीन मतदारसंघांत पहिल्यांदाच व्हिव्हीपॅट या यंत्राचा वापर करण्यात येत असून, त्याद्वारे मतदाराने केलेले मतदान त्याला या यंत्रात त्याच उमेदवाराला झाले किंवा कसे हे पाहता येणार आहे.
या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळी पत्रकारांना जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी माहिती दिली. पंधरा मतदारसंघांतील ४२०८ मतदान केंद्रांवर २९ हजार १६० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण व निवडणूक साहित्याचे वाटप त्या-त्या विधानसभा मतदारसंघातून करण्यात आले. साहित्य वाहण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. निवडणूक प्रकियेवर लक्ष ठेवण्याकरिता प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, जवळपास ११४ सूक्ष्म निरीक्षकही नेमले आहेत. ते थेट निवडणूक आयोगाला आपला अहवाल सादर करतील.