एकलहरे केंद्र जागेवर सोलर पॉवर प्लॅन्टची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:20 IST2018-11-13T01:19:12+5:302018-11-13T01:20:13+5:30
औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

एकलहरे केंद्र जागेवर सोलर पॉवर प्लॅन्टची शक्यता
नाशिक : औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लॅन्ट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले. त्यामुळे एकलहरे औष्णिक केंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आघाडी सरकारच्या काळात एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सत्तांतरानंतर एकलहरे प्रकल्प थेट नागपूरला स्थलांतरित करण्याबाबतची चर्चा होऊ लागली. त्यामुळे येथील कामगार, पूरक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी सदर प्रकल्प कामयस्वरूपी सुरू राहावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. यापूर्वी पाच संचाच्या साह्याने सुमारे साडेनऊशे मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रातील संच टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत तर सध्या २१० मेगावॉटचे केवळ तीन संच कार्यान्वित आहेत.
ग्रीन एनर्जी प्रस्तावित
१२व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पवन आणि सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे नवीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकलहरे येथील जागेची पडताळणी होऊन शकते. एकलहरे प्रकल्पाची सुमारे ६८५ हेक्टर इतकी जागा आहे तर यातील केवळ ३५ ते ४० टक्केच जागेचा वापर होत असून उर्वरित जागा पडून आहे.
ज्या औष्णिक प्रकल्पांमधून कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे तेथील उपलब्ध जागेचा वापर हा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारण्यासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. एकलहरे येथील रोजगार कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर प्लॅन्टचा पर्याय असल्याचे सुचक विधानही पाठक यांनी केले आहे. त्यामुळे औष्णिक केंद्र केव्हाही गुंडाळले जाऊ शकते, असाच अर्थ यातून काढला जात आहे.
औष्णिक वीज निर्मिती करणे खर्चिक बाब असल्यामुळे या केंद्रातून कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे,मात्र सदर प्रकल्प बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचा विश्वास होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.
असे असले तरी ज्या ठिकाणी कोळसा पोहचविणे खर्चिक आहे तेथील संच पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्याचेदेखील त्यांनी सांगितल्यामुळे एकलहरे प्रकल्प आहे त्याच स्थितीत राहणार की भविष्यात बंद होणार याविषयीचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
सध्या एकलहरे येथील औष्णिक केंद्रात दोनच संचांमधूनच वीज निर्मिती केली जात आहे. तर एक संच बंद अवस्थेत असल्यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प अखेरच्या घटका मोजत असल्याच्या धसक्याने कामगारांसह गावकरीदेखील धास्तावले आहेत.