टपाल खात्याच्या परीक्षेत भावी कर्मचार्यांची पायपीट
By Admin | Updated: May 11, 2014 20:19 IST2014-05-11T19:34:32+5:302014-05-11T20:19:28+5:30
परीक्षार्थींचे हाल : दहा हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

टपाल खात्याच्या परीक्षेत भावी कर्मचार्यांची पायपीट
परीक्षार्थींचे हाल : दहा हजार उमेदवारांनी दिली परीक्षा
नाशिक : शासकीय असूनही दुर्लक्षित असलेल्या टपाल खात्यात होणार्या भरतीसाठी आयोजित परीक्षेतच भावी कर्मचार्यांना पायपीट करावी लागल्याने अनेकांनी पोस्टाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
राज्यातील सुमारे ७९० जागांसाठी रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे येथे या परीक्षा घेण्यात आल्या. १०० मार्कांच्या परीक्षेसाठी नाशिक विभागात झालेल्या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १०,६९७ उमेदवारांनी हजेरी लावली. परीक्षा घेताना ती कोणत्या केंद्रावर घ्यावी, याचे नियोजन दिल्लीच्या एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने नाशिकमध्ये सात केंद्रांवर ही परीक्षा घेतली. स्थानिक माहितीच्या अभावाने या संस्थेने संदीप फाउंडेशन आणि सपकाळ नॉलेज हब अशी शहराबाहेरील दोन केंद्रे निवडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचेही हाल झाले.
या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून विद्यार्थी आले होते. टपाल खात्याची परीक्षा देणारे मुळात मध्यमवर्गीय समजले जातात. त्यात ते बेरोजगार. अशा अवस्थेत शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले परीक्षा केंद्र घेण्याऐवजी शहराच्या टोकावर असलेले परीक्षा केंद्र घेतल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी दोनच्या परीक्षेसाठी दुसर्या जिल्ातून येणार्या विद्यार्थ्यांनी सकाळीच शहरात हजेरी लावली होती. काही परीक्षार्थी एक दिवस आधीच आले होते. परंतु आज सकाळी शहरात दाखल झालेल्या परीक्षार्थींनी संदीप पॉलिटेक्निक आणि सपकाळ नॉलेज हब शोधण्यात बराच वेळ खर्ची केला. याबरोबरच त्या परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने स्पेशल रिक्षा करून त्यांना परीक्षा केंद्र गाठावे लागले. यामध्ये पैसा खर्च होण्याबरोबरच त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला.
परीक्षा केंद्र गाठल्यानंतरही स्पष्ट सूचना नसल्याने संदीप आणि सपकाळ महाविद्यालयांत गेलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग शोधण्यासाठी कॅम्पसचा मोठा विभाग धुंडाळावा लागल्यानेही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. सपकाळ नॉलेज हब येथे २१४०, तर संदीप फाउंडेशनला ५००० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर या रस्त्यावर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. त्यांना मध्यवर्ती बसस्थानकात येण्यासाठी रिक्षा नसल्याने अखेर महामंडळाच्या बसेसला पाचारण करावे लागले होते. तरीही विद्यार्थ्यांची सायंकाळी उशिरापर्यंत पायपीट सुरूच होती. धुळे येथील प्रवर अधीक्षक बाबरस, एस. बी. गोडसे, रामभाऊ परघमल यांनी या परीक्षांवर नियंत्रण ठेवले.