नाशिकमधील 'सलून ऑन व्हील्स' पाहिलेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:20 IST2018-03-01T16:12:26+5:302018-03-01T16:20:24+5:30
संतोष शिंदे या व्यवसायिकाने ट्रकवरील फिरत्या सलूनचा हा प्रयोग केला असून तो आकर्षणही ठरत आहे.

नाशिकमधील 'सलून ऑन व्हील्स' पाहिलेत का?
नाशिक: आतापर्यंत आपण एखाद्या चारचाकी गाडीवर मिसळ पाव , आईस्क्रीमसारखे खाद्यपदार्थ किंवा फारफार तर कपडे विक्रीचे दुकान बघितलं असेल. मात्र, सध्या नाशिकमध्ये अशीच एक चारचाकी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चारचाकीवर चक्क केशकर्तनालय म्हणजे सलून थाटण्यात आले. संतोष शिंदे या व्यवसायिकाने ट्रकवरील फिरत्या सलूनचा हा प्रयोग केला असून तो आकर्षणही ठरत आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील संतोष शिंदे गेल्या 22 वर्षांपासून सलून मध्ये काम करतात. पण दुसऱ्या दुकानात कारागीर म्हणून किती दिवस काम करायचं म्हणून त्यांनी भाड्याने नाशिकरोड येथे गाळा घेवुन व्यवसाय केला. आता स्वतःच्या मालकीचे दुकान थाटल पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना अपेक्षित गाळा सुमारे 10 ते 15 लाख रुपयांना विकत मिळणार असल्याने त्यांची अडचण झाली. अखेरीस त्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांना चक्क आयशर ट्रक विकत घेतला आणि त्यावरच दुकान थाटलं. अखंड वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर, ग्राहकांसाठी चहा-कॉफीची सोय आणि आकर्षक इंटेरियर यासाठी खर्च केला आणि ग्राहकांना सेवा देणं सुरू केले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी सलून ऑन व्हील सुरू केले.नाशिकरोड येथील उड्डाण पुलाखाली असलेले हे सलून आकर्षणाचा केंद्र ठरले आहे. विशेषतः धुळे, जळगावसह अनेक जिल्ह्यातील नाभिक व्यवसायिक हे फिरते केशकर्तनालाय बघायला येतात आणि शिंदे यांचे कौतुकही करतात.