पोलिसांची ‘तटबंदी’ कायम
By Admin | Updated: August 6, 2015 00:07 IST2015-08-06T00:05:37+5:302015-08-06T00:07:01+5:30
स्वामी नारायणनगर : रहिवाशांना घ्यावा लागतो मोठा फेरा

पोलिसांची ‘तटबंदी’ कायम
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गोदाकाठ परिसरासह आता नवीन आडगाव नाक्याकडून जाणाऱ्या जवळपास सर्वच मार्गावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्ते अडविण्याचा प्रकार सुरू केल्याने स्थानिक नागरिकांसह विक्रेते तसेच विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन त्रस्त झाले आहे. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी सुरू केलेली तटबंदी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.
पोलीस प्रशासनाने तपोवन, साधुग्राम परिसरासह निफाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच श्री स्वामी नारायणनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्ते बंद केले आहे. स्वामी नारायणनगरातील नागरिकांना जुन्या आडगाव नाक्याकडे येताना त्रास तर सहन करावा लागतोच आहे. शिवाय घराकडे परतायचे असल्यास तब्बल नवीन आडगाव नाक्याकडून थेट के. के. वाघ महाविद्यालयाच्या चौफुलीकडून जावे लागत आहे. तर पुढे तपोवनात जाणाऱ्या जनार्दन स्वामी आश्रमाकडचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांची अडचण होत आहे. भाजी विक्रेते तसेच हातगाडीधारकांवर तर संक्रांतच आली आहे. रस्ता बंदमुळे शाळा व्यवस्थापनाला मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसचालकांना तर चक्क दोन ते तीन किलोमीटर अंतर कापून बस शाळेकडे न्यावी लागत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना ने-आण करण्याच्या वेळेत होत आहे. पोलीस प्रशासनाने केलेली तटबंदी ही सुरक्षिततेसाठी की पोलिसांना बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा यासाठी आहे असेच नागरिकांमध्ये बोलले जात असून पोलीस प्रशासन बंदोबस्ताच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)