Police cell: Three persons who beat up a doctor are missing | पोलीस कोठडी : डॉक्टरला मारहाण करणारे तीघे गजाआड

पोलीस कोठडी : डॉक्टरला मारहाण करणारे तीघे गजाआड

ठळक मुद्देन्यायालयाने येत्या गुरूवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावलीरूग्णालयातील साहित्याचीसुध्दा तोडफोड केली

नाशिक : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रूग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कॅक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यात पंचवटी परिसरातील एका महिला रूग्णाला येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रूग्ण दगावला. मृत्यूपश्चात सदर महिला रूग्णाचा कोरोना नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. यानंतर महिलेच्या काही नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी सोमवारी रूग्णालय गाठले. संध्याकाळच्या सुमारास अंबडलिंकरोडवरील रुग्णालयात चार ते पाच इसमांनी धडक देत रूग्णालयाच्या डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरूवात केली. यावेळी एका इसमाने थेट डॉक्टरला मारहाण केली. हा सगळा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला. या कॅमे-याचा व्हिडिओ सोशलमिडियावरून चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरूध्द तक्रार देत घडलेला प्रकार कथन केला. यावेळी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांच्या टोळक्याने रूग्णालयातील साहित्याचीसुध्दा तोडफोड केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावरून खात्री करत संशयितांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेत कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टरांना सुरक्षा देत डॉ. पाटील यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे संशयितांच्या वर्णनावरून माग काढत पंचवटी परिसरातून पियुष उल्हास राजुरकर (३०,रा.गुंजाळबाबानगर, हिरावाडी), आकाश अशोक पाटील (२६,वाल्मीकनगर, वाघाडी), संग्राम बबन बारकु-पाटील (४४,रा.पाण्याच्या टाकीजवळ वाघाडी), यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याविरूध्द पोलिसांनी वैद्यकिय सेवा, व्यक्ती संस्था हिंसक कृत्य व मालमत्ता हानी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरूवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक कमलाकर जाधव हे करीत आहेत.


 

Web Title: Police cell: Three persons who beat up a doctor are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.