पिंपळगावचे मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:33 IST2020-12-24T15:32:36+5:302020-12-24T15:33:58+5:30
पिंपळगाव बसवंत : जिल्हा परिषदेच्या पाठबळाने व शिक्षकांच्या सहकार्याने शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून सहा महिने ७३ गावांमधील सुमारे एक लाख मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविल्याबद्दल पिंपळगाव बसवंत येथील जिल्हा परिषद शाळा देवीचा माता येथील मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांना दिल्लीतील कॉइट्स क्राफ्ट या संस्थेतर्फे इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

पिंपळगावचे मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर शहरी भागात अँड्रॉइड फोन व लॅपटॉपवरून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले मात्र ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू लागले . हे लक्षात आल्यावर वाघ यांनी स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक चॅनल सुरू करण्याची संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार ,विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व केंद्रप्रमुख बबिता गांगुर्डे यांच्याकडे मांडली. त्यांच्या पाठबळाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आणि निफाड तालुक्यातील ७३ गावांमध्ये प्रक्षेपण होणाऱ्या रेम्बो केबल नेटवर्कवर बालभारती चॅनल सुरू करण्यात आले. त्याद्वारे निफाड तालुक्यातील सुमारे एक लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच कोरोनाकाळापूर्वी वाघ व त्यांचे सहकारी इम्रान पठाण यांनी मुलांना विमानाद्वारे पिंपळगाव ते दिल्ली ही शैक्षणिक सहल घडविली होती. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची दखल दिल्ली येथील कॉईट्स क्राफ्ट या संस्थेच्या निवड समितीने घेतली. वाघ यांना ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात इनोव्हेशन इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शास्त्रज्ञ एच.के. सरदाना, डॉ. विजयकुमार शहा, डॉ. कुणाल काला, पी. के. भारद्वाज, रिचा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.