सासऱ्याने जावयावर रोखले पिस्तूल
By Admin | Updated: August 14, 2015 00:13 IST2015-08-14T00:13:21+5:302015-08-14T00:13:33+5:30
सासऱ्याने जावयावर रोखले पिस्तूल

सासऱ्याने जावयावर रोखले पिस्तूल
नाशिक : जमिनीच्या वादातून राग आल्याच्या कारणावरून सासऱ्याने थेट जावयावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करत पिस्तुलीच्या मागील लाकडी बाजूने कपाळावर मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास गंगापूर येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
बेळगावढगा येथे राहणारे किरण बबनराव ढगे (३०) यांची आई यमुनाबार्इंच्या वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा, यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या जमिनीवर मामाकडून बोझा चढविण्यात आल्याची चौकशी करण्यासाठी किरण हे गंगापूर येथील बालाजी मंदिराजवळील एका खासगी बॅँकेत चौकशीसाठी गेले होते. त्यादरम्यान, संशयित बाळासाहेब रंगनाथ पाटील यांनी बॅँकेजवळ येऊन किरण बाहेर येताच त्यांच्याशी हुज्जत घालत जिवे मारण्याची धमकी देत पिस्तूल रोखले. दरम्यान, किरण यांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी पिस्तुलाच्या मागील बाजूने असलेल्या लाकडी भागाने मारहाण केली. याप्रकरणी किरण यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक महेश देवीकर करत आहे.