मुलगी झाल्याच्या कारणावरून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST2018-11-14T23:43:53+5:302018-11-15T00:12:20+5:30

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच मुलगी झाली, आम्हाला मुलगा हवा होता या कारणावरून पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून स्त्रीधन काढून घेत दोन वर्षांच्या मुलीसह घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे़

 Persecution due to the girl child | मुलगी झाल्याच्या कारणावरून छळ

मुलगी झाल्याच्या कारणावरून छळ

नाशिक : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच मुलगी झाली, आम्हाला मुलगा हवा होता या कारणावरून पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून स्त्रीधन काढून घेत दोन वर्षांच्या मुलीसह घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी प्रियंका कृष्णा गोसावी (२७, रा़ ७, चंद्रलोक हौसिंग सोसायटी, कामटवाडा) या विवाहितेच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी पती कृष्णा गोसावी, सुरेश गोसावी (सासरे), संगीता गोसावी (सासू) व धनंजय गोसावी (दीर) यांच्या विरोधात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल केला आहे़
प्रियंका गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार औरंगाबाद रोडवरील यश लॉन्समध्ये २७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचा कृष्णा गोसावी यांच्यासोबत विवाह झाला़ या विवाहाप्रसंगी त्यांचे वडील झुंबर भारती (रा़ अंबिका स्मृती, प्रियंका पार्क, तिडके कॉलनी) यांनी अडीच लाख रुपयांचे दागिने तसेच नवीन कार तसेच घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या़ विवाहानंतर दोन-तीन महिने चांगली वागणूक दिल्यानंतर पती, सासू, सासरे व दीर यांनी लग्नात कमी हुंडा दिला या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करू लागले़ तर सासूने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत असे़
पती कृष्णा गोसावी हे सतत संशय घेत असत तसेच सासरे व दीर हेदेखील परपुरुष असून त्यांच्याशी बोलू नको, असे म्हणून मारहाण करीत असत़ गर्भवती असताना डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर सासूने वडिलांनी दिलेले सर्व दागिने गोड बोलून काढून घेतले़ यानंतर २२ नोव्हेंबर २०१६ रोजी मुलगी झाली असता आम्हाला मुलगा हवा होता, तुला नांदवणार नाही असे म्हणू लागले़ तर पतीने तू घरात आल्यापासून बाहेरची बाधा झाली आहे, असे सांगून २ डिसेंबर २०१७ रोजी दोन वर्षांची मुलगी कनिष्कासह घराबाहेर हाकलून दिल्याचे विवाहिता प्रियंका गोसावी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title:  Persecution due to the girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.