कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:34 IST2023-06-01T16:32:29+5:302023-06-01T16:34:46+5:30
कळमदरे येथील डोंगरात वनविभागाने पाणवठ्यांची सोय केलेली नाही. त्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसू लागला आहे.

कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू
महेश गुजराथी
चांदवड, जि. नाशिक - तालुक्यातील कळमदरे येथे महावितरण कंपनीच्या रोहित्रामध्ये वीजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी वीजेचा धक्का लागून एक माकड जखमी झाले होते. त्यावेळी प्राणीप्रेमींनी सदर जखमी माकडास वनविभागाच्या सुपुर्द केले होते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांप्रमाणेच जनावरांचीही भटकंती होत असून पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत.
तालुक्यातील कळमदरे येथील डोंगरात वनविभागाने पाणवठ्यांची सोय केलेली नाही. त्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसू लागला आहे. कळमदरे येथील विद्यूत रोहित्रात विजेचा धक्का लागून बुधवारी (दि. ३१मे) एका मोराला आपला जीव गमवावा लागला. प्राणीप्रेमी भास्कर वानखेडे व मेजर सुनील गांगुर्डे यांनी या घटनेची माहिती वन विभागाला देऊन मोर वन विभागाच्या ताब्यात दिला. वन विभागाने मृत मोरावर गुरूवारी (दि.१) अंत्यसंस्कार केले. यावेळी वनपरिक्षेत्रअधिकारी संजय वाघमारे, वनपाल पी.पी सोमवंशी, वनरक्षक बीपी मरशिवणे यांच्या सह वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या विरोधात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.