पवार, ऑम्वेट यांचा संघर्ष पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:15+5:302021-09-03T04:16:15+5:30
नाशिक : स्थलांतरित, विस्थापित आणि वंचितांसाठी आंदोलन, लढे आणि लेखणी चालविणारे गेल ऑम्वेट आणि जयंत पवार यांचा संघर्ष ...

पवार, ऑम्वेट यांचा संघर्ष पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार !
नाशिक : स्थलांतरित, विस्थापित आणि वंचितांसाठी आंदोलन, लढे आणि लेखणी चालविणारे गेल ऑम्वेट आणि जयंत पवार यांचा संघर्ष तसाच पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार करणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करीत प. सा. नाट्यगृहात दोघांना अभिवादन करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालय आणि अन्य परिवर्तनवादी संस्थांतर्फे प. सा. नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ज्येष्ठ विदुषी गेल ऑम्वेट आणि नाटककार, पत्रकार जयंत पवार यांना अभिवादन करण्यात आले. जयंत पवार हे वेगळ्या वाटेवरचे नाटककार आणि पत्रकार होते. त्यांनी गिरणी कामगारांसाठी केलेले नाटकांतील लिखाण अनेकांचे प्रेरणास्रोत ठरले आहे. त्यांची नाटके म्हणजे सामाजिक संघर्षाचा मानबिंदू होता, अशी भावना पवार यांना आदरांजली वाहताना मान्यवरांनी व्यक्त केली. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातून विस्थापितांची सेवा करण्यासाठी महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या गेल ऑम्वेट यांचे कार्य महान आहे. त्यांनी आयुष्यभर सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष केला. राज्यात त्यांनी परिवर्तनाची चळवळ नेली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करून त्यांनी महिला शिक्षण, परित्यक्त्या, शेतकरी आणि धरणग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडली. या शोकसभेत रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, बी. जी. वाघ, गंगाधर अहिरे, राजू देसले, महादेव खुडे, करुणासागर पगारे, जयप्रकाश जातेगावकर यांनी संवेदना व्यक्त केल्या. प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.
----------
इन्फो
गेल ऑम्वेट यांना कॉ. गोविंद पानसरे पुरस्कार
रावसाहेब कसबे यांनी महान सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्वेट यांना कॉ. गोविंद पानसरे यांच्या नावाने मरणोत्तर पुरस्कार जाहीर केला. कॉ. गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार समितीतर्फे हा पुरस्कार देण्यात येईल. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार नाशिकचे पदाधिकारी गेल ऑम्वेट यांच्या कासेगाव या मूळगावी नेऊन त्यांचे पती भारत पाटणकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.