पेस्ट कंट्रोलचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीवर
By Admin | Updated: August 6, 2015 00:10 IST2015-08-06T00:08:00+5:302015-08-06T00:10:14+5:30
आज चर्चा : प्रशासनाकडून नव्याने नियमावली

पेस्ट कंट्रोलचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीवर
नाशिक : गेल्या दीड-पावणे दोन वर्षांपासून मुदतवाढीचा खेळ सुरू असलेला पेस्ट कंट्रोलचा प्रस्ताव अखेर प्रशासनाने नव्याने नियमावली तयार करत गुरुवारी (दि.६) होणाऱ्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. घंटागाडीचा ठेका चालविणाऱ्या ठेकेदाराची सर्वांत कमी दराची निविदा आल्याने त्याला तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा ठेका देण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीवर चर्चा होणार आहे.
शहरात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी व नागरी हिवताप योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पेस्ट कंट्रोल अर्थात कीटकनाशक धूर व अळीनाशक फवारणी केली जाते. गेल्या दीड-पावणे दोन वर्षांपासून पेस्ट कंट्रोलचा ठेका महापालिकेत गाजत आहे. संबंधित ठेकेदाराला तब्बल १४ वेळा मुदतवाढ देण्याचा पराक्रमही प्रशासनाने केला. या मुदतवाढीला लोकप्रतिनिधींनी वारंवार विरोध दर्शविल्यानंतर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नव्याने ठेका देताना कठोर नियमावली तयार करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने नियमावली तयार केल्यानंतर पेस्ट कंट्रोलसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सर्वांत कमी दराची निविदा भरणाऱ्या दिग्विजय एंटरप्रायजेसला तीन वर्षांच्या कालावधीसाठी १९ कोटी ८० लाख रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नाशिक पश्चिम वगळता अन्य विभागात संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी काम करणार आहेत. पेस्ट कंट्रोलचे काम महापालिकेने कंत्राटदारास न देता ते स्वत:च्याच कर्मचाऱ्यांमार्फत करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केलेली असताना आणि पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही मानधनावर महापालिकेत सामावून घेण्याची मागणी लावून धरल्याने स्थायी समिती नेमका काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागून आहे.