पळसे: ऊसशेतीत बिबट्याचा भरदुपारी संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:33 IST2020-06-21T17:19:08+5:302020-06-21T17:33:15+5:30
वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पळसे: ऊसशेतीत बिबट्याचा भरदुपारी संचार
नाशिक : पळसे शिवारातील टेंभी मळ्यात एमआयडीसी रस्त्याला लागून असलेल्या ऊसशेतीत बिबट्याचा भरदिवसा मुक्त संचार पहावयास मिळाला. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. लोकवस्तीला लागून असलेल्या ऊसशेतीत बिबट्या धुमाकूळ घालताना भर दुपारी लोकांना नजरेस पडला. यावेळी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन घडले.
टेंभी मळ्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या शेवगेदारणा शिव रस्त्यालगत अंकुश कासार यांच्या घराच्या अंगणात खेळणा-या समृध्दीवर १० जूनरोजी रात्री बिबट्याने हल्ला केला; सुदैवाने या हल्ल्यात समृध्दीचे तीच्या आजीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा बिबट्याने येथील ऊसशेतीत आश्रय घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भय दाटून आले आहे. वनविभागाच्या कर्मचा-यांकडून सातत्याने दारणानदीचा काठ पिंजून काढत विविध गावांच्या पंचक्रोशीत पिंजरे लावण्यात आले आहेत; मात्र बिबट्या अद्याप जेरबंद कोणत्याही ठिकाणी होऊ शकलेला नाही. यामुळे बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, आणि थेट मोठ्या जंगलात नेऊन सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या गावापासून उत्तरेला मोहगाव, बाभळेश्वर अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.
भरदिवसा बिबट्याने या ऊसशेतीतून बाहेर धूम ठोकत मोठ्या ऊसाच्या क्षेत्रात माणसांच्या उपस्थितीत भरधाव वेगाने पळत आश्रय घेतला. बिबट्याची धाव बघून अनेकांची पाचावर धारण बसली. यावेळी येथे उपस्थित वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, अनिल आहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, उत्तम पाटील आदिंनी गावक-यांना बांधावर रोखून धरले.