ओझरला सात दुचाकींसह तीन चोरटे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:20 IST2021-06-30T01:19:52+5:302021-06-30T01:20:15+5:30
ओझर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयास्पद आढळून आलेल्या तीन चोरट्यांकडून सात मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यांना अटक केली आहे.

ओझर पोलिसांनी पकडलेल्या तीन चोरट्यांसह पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, इम्रान खान, किशोर अहिरराव, नितीन करंडे.
ओझर टाऊनशिप : ओझर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयास्पद आढळून आलेल्या तीन चोरट्यांकडून सात मोटारसायकली हस्तगत केल्या असून, त्यांना अटक केली आहे.
पोलीस कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका मोटारसायकलवर तीन जण बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिघांनाही पकडून त्यांच्याकडून चोरीच्या सात मोटारसायकली हस्तगत केल्या.
ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक राहटे यांच्यासह ओझर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिराव, इम्रान खान, नितीन करंडे हे ओझर परिसरात गस्त घालत असताना भारत विधाते (रा. जानोरी), राहुल सोनवणे ऊर्फ (नाइनव्या), किरण कर्डक ऊर्फ (के.के) हे शाइन मोटारसायकलवर बसलेले आढळले असता गुन्हे शोध पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याजवळील मोटारसायकलीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी शाइन मोटारसायकल सातपूर येथून चोरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी ओझर, पंचवटी, खेरवाडी, नाशिक रोड, नाशिक तालुका येथून एकूण ७ वाहने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून ७ वाहने हस्तगत केली. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल व स्वप्नील जाधव हे करीत आहेत.