सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:19 AM2021-04-30T04:19:46+5:302021-04-30T04:19:46+5:30

सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयातून रात्रीच्या वेळी भरलेले ऑक्सिजन सिलिंडर गायब होत असून रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याची तक्रार ...

Oxygen cylinder disappears from Sinnar Rural Hospital | सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब

googlenewsNext

सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयातून रात्रीच्या वेळी भरलेले ऑक्सिजन सिलिंडर गायब होत असून रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याची तक्रार करीत शिवसैनिकांनी सिन्नर ग्रामीण कोविड रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन सुरू होते.

शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी रात्री ९ भरलेले ऑक्सिजन सिलिंडर गायब झाल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. याबाबत सकाळी कुजबुज सुरू झाल्यानंतर शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गैरसमजुतीतून रिकाम्याऐवजी भरलेले सिलिंडर नेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

दरम्यान, दिवसभरात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याचे सांगून रुग्णांना बेड न देता इतरत्र पाठविण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते उदय सांगळे यांनी केला. एकीकडे ऑक्सिजनअभावी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातून भरलेले सिलिंडर गायब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे सांगळे यांनी सांगितले. दररोज रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर गायब होत असल्याचा अंदाज शिवसैनिकांनी व्यक्त केला. या आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेडमेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडरची चौकशी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.

यावेळी माजी आ. राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक पंकज मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, पिराजी पवार, गौरव घरटे, शैलेश नाईक, विजय जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो ओळी- सिन्नर ग्रामीण कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करताना शिवसैनिक.

Web Title: Oxygen cylinder disappears from Sinnar Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.