अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:33 IST2024-03-13T13:33:15+5:302024-03-13T13:33:28+5:30
दशरथ पाटील यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचेही पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे.

अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले
नाशिकमध्ये उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा काल श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. या जागेवर भाजपाचा देखील दावा आहे. परंतु, नाशिकमधून लढण्यासाठी शांतिगिरी महाराजही उत्सुक आहेत. त्यांनी शिंदेंची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. अशातच आता नशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील भेटीगाठी सुरु केल्याने चुरस वाढली आहे.
दशरथ पाटील यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचेही पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे. तसेच तिकीट नाही दिले तरी अपक्ष लढण्याचीही तयारी असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
शरद पवार राज्यातील प्रश्नांची जाण असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचे दिग्गज नेतृत्व आहे. २००४ ची निवडणूक लढवली तेव्हा पवारांनी माझ्यावर टीका केली नव्हती. तेव्हापासून शरद पवार यांचे नाव माझ्या मनात कोरले गेले आहे. निवडणूक हरलो, तेव्हा बाळासाहेब मला राज्यसभा देत होते. मला मागच्या दाराने जायचं नाही, लोकांमधून निवडून यायचे आहे, असे मी बाळासाहेबांना सांगितले होते, असे पाटील म्हणाले.
बाळासाहेबांची आणि शरद पवारांची मैत्री होती. तोच धागा मनात ठेवून मी आज इथे आलो आहे. पवारांकडे लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संजय राऊत यांना देखील भेटलो, आमची सामना कार्यालयात बैठक झाली होती. जागा शरद पवार गटाकडे गेली, तर पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडे गेली तर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याचा हक्क पूर्वीपासून होता. आता प्रस्ताव ते मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे. अन्यथा अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील तयारी असल्याचे पाटील म्हणाले.