... अन् आदिवासी बांधवांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:09 IST2021-04-17T20:51:25+5:302021-04-18T00:09:01+5:30
देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात गुंजाळनगर येथील कोरोना दक्षता समितीला अखेर यश आले आहे. त्यानुसार १५ आदिवासी बांधवांनी उत्साहात कोविड लसीकरण करून घेतले.

गुंजाळनगर येथे कोविड लसीकरण करून घेताना महिला.
देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात गुंजाळनगर येथील कोरोना दक्षता समितीला अखेर यश आले आहे. त्यानुसार १५ आदिवासी बांधवांनी उत्साहात कोविड लसीकरण करून घेतले.
तालुक्यात गुंजाळनगर येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होऊन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाबाबत शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई तसेच गावात जनजागृती मोहीम राबवून कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागातील कोरोना चाचणी संख्या वाढविणे व गावात लसीकरण शिबीर घेणे आदी निर्णय घेण्यात आले होते.
या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शनिवारी (दि.१७) गुंजाळनगर येथील जि. प. प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील एकूण १३३ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. त्यात आदिवासी बांधवांचेही गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात आले. यासाठी ग्रामसेवक वैभव निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजेंद्र गुंजाळ, सुजाता गुंजाळ, माजी सरपंच सतीश गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, डॉ. संजय निकम, पप्पू गुंजाळ, नानू आहेर, संदीप देवरे, आशासेविका आदींनी परिश्रम घेतले.
तालुक्यातील अनेक गावांत आदिवासी बांधव भीती व गैरसमजामुळे कोविड लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्या गावातील खासगी डॉक्टर व ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन आदिवासी बांधवांच्या मनातील भीती दूर करावी व त्यांचे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. राजेंद्र गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य, गुंजाळनगर
---- आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्यामुळे कर्मचारीसंख्या कमी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ४५ वर्षांपुढील नागरिकांची पुरेशा प्रमाणात नोंदणी करून मागणी केल्यानंतर गावागावांत कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात येईल.
- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.