अंगणवाड्यांना नियमानुसार मानधन द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:50 IST2019-08-12T00:49:16+5:302019-08-12T00:50:33+5:30
महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे.

अंगणवाड्यांना नियमानुसार मानधन द्यावे
नाशिक : महापालिका अंगणवाड्यांतील मुख्य सेविका, सेविका, मदतनीस यांना शासनाच्या नियमानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली असून, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे.
स्थायी समिती सभापतींना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी १९९४ पासून अंगणवाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. सदर अंगणवाड्यांमध्ये कार्यरत सेविकांना दिले जाणारे मानधन अत्यल्प म्हणजे फक्त सुमारे ५ हजार रुपये आहे. या अल्प मानधनावर कुटुंबाची उपजीविका करणे जिकिरीचे असल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. कारण जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सुमारे ८ हजार मानधन देण्यात येते. त्यामुळे मनपा अंगणवाडी सेविकांच्या मनधनात दुप्पट वाढ करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून आर्थिक गणना, पल्स पोलिओ डोस, मतदार नोंदणी अभियान, आरोग्य अभियान आदी राष्टÑीय उपक्रम राबविण्यात येतात. या अतिकालीन कामाचे वेतन व अन्य भत्ते अद्याप मिळालेले नाहीत. सदर वेतन तातडीने देण्यात यावे. तसेच थकीत मानधनदेखील मिळावे, त्यांना सेवानिवृत्ती योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच सदर प्रस्ताव स्थायी समितीवर मंजूर करण्याची मागणी केली आहे.