दफनभूमीजवळ डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:17 IST2018-08-25T13:17:13+5:302018-08-25T13:17:51+5:30
वीरशैव लिंगायत समाजाचे आयुक्तांना निवेदन

दफनभूमीजवळ डिझेल दाहिनी बसविण्यास विरोध
नाशिक/पंचवटी : पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनी बसू नये, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येऊन डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे.
सध्या या जागेत समाजातील अनेक कैलासवासी बांधवांच्या समाधी आहेत, सदर जागेची साफसफाई करत असताना काही समाधीची विटंबना झाली असून, या ठिकाणचे पिंपळ, कडूनिंब तसेच चिंच हे वृक्ष तोडण्यात आल्याने समाजातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाची समाजबांधवांना कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. मनपा प्रशासनाने डिझेल दाहिनीसाठी सुरू केलेले काम त्वरित थांबवावे, अन्यथा मनपासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.