नाशिक : देशात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनविण्याची भूमिका केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला पूरक ठरेल, असे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधी या विषयावर नाशिकमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत दिली. खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी व व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणालीचाही या चर्चासत्राच्या निमित्ताने शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिकमधील हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सतर्फे शुक्रवारी (दि.१५) सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत ‘संरक्षण व हवाई उत्पादन (एरोस्पेस) उद्योग क्षेत्रातील संधी’ विषयावर चर्चासत्र होणार आहे. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग असून ते पुणे व मुंबईसारख्या औद्योगिक क्षेत्रासाठी मुख्य पुरवठादार होऊ शकतात. तसेच भारतीय सैन्याचे शस्त्रास्त्र व युद्धसामग्री उत्पादन स्वदेशी करण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी ठरेल, असा विश्वास डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त के ली आहे. या चर्चासत्रात आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी), संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान (डीआरडीओ), डायरेक्टर जनरल क्वॉलिटी अॅश्युरन्स (डीजीक्युए) डायरेक्टर जनरल एअर क्वॉलिटी अॅश्युरन्स (डीजीएक्यूए), संरक्षण क्षेत्रातील कार्यरत एचएएल, जीएसएल अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसह खासही उद्योगांचे प्रतिनिधीही या चर्चासत्रात सहभागी होणार असून, औद्योगिक क्षेत्रातील निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चरर आणि लघुउद्योग भारती आदी संघटनांचाही चर्चासत्रात सहभाग असणार आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांनी हे चर्चासत्र घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला होता.वरिष्ठ अधिकारी, उद्योजकांचे मार्गदर्शनचर्चासत्रात कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय)चे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुझ खामबत्ता यांच्यासह सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅ क्चरर्सचे महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा, सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅ क्चरर्सचे अध्यक्ष बाबा कल्याणी, भारतीय हवाई दलाचे एअरमार्शल एस.बी. देव, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू, राज्याच्या लघु व मध्यम उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करणार असून, आर्टिलरी स्कूल, नौदल, हवाई दल व लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
नाशकात हवाई उत्पादन उद्योगातील संधीचे दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:31 IST