‘कोरोना वॉरियर्स’साठी टाळ्या वाजविणारे हातच जेव्हा मागे हटतात...
By अझहर शेख | Updated: May 7, 2020 19:38 IST2020-05-07T19:30:25+5:302020-05-07T19:38:21+5:30
‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे.

‘कोरोना वॉरियर्स’साठी टाळ्या वाजविणारे हातच जेव्हा मागे हटतात...
नाशिक : इन योद्धाओं की करो देखभाल, तो देश जीतेगा हर हाल... असे सातत्याने आवाहन केले जात आहे; मात्र अद्यापही या आवाहनाचा फारसा परिणाम जनसामन्यांमध्ये दुर्दैवाने दिसून येत नाही. काही दिवसांपुर्वी ज्या हातांनी टाळ्या वाजवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांचे आभार मानले आता तेच हात ‘त्या’ कोरोना योद्धयाच्या मदतीला पुढे येत नसल्याची खंत शहरातील एका डॉक्टरच्या पुत्राने थेट अमेरिकेतून सोशलमिडियावर एका पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्य कोरोनासारख्या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाशी तोंड देण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेचे सर्व डॉक्टर, परिचारिका अहोरात्र झटत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी पोलीस दलदेखील युध्दपातळीवर रस्त्यांवर रणरणत्या उन्हात अन् रात्रीच्या अंधारात पहारा देत आहेत. जेणेकरून कोरोनाची वाढत जाणारी साखळी कुठेतरी तोडता येणे शक्य होईल, मात्र नाशिक शहरासह जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा आजार नियंत्रणात येतानाची चिन्हे आकड्यांवरून दिसत नाही. अशा महाभयंकर संकटात थेट आपला जीव धोक्यात घालून जनतेला सेवा देणा-या डॉक्टर, पोलिसांवर कुठे जनसामान्यांकडून पुष्पवृष्टी केली जात आहे, तर कोठे त्यांचे औंक्षणही होत आहे. एवढेच नव्हे तर या ‘कोरोना वॉरियर्सला’ भारतीय सेनेच्या तीनही दलांनीदेखील ‘सॅल्यूट’ केला आहे.
पत्राचे ट्विट पंतप्रधानांनाही ‘टॅग’
या कोरोना योद्धयच्या पुत्राने लिहिलेली इंग्रजीतून पत्र ट्टिवटरवर पोस्ट केले आहे. या ट्टिवटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून विविध मंत्र्यांसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनाही त्यांच्या ट्टिवटर हॅन्डलवर ‘टॅग’ केले आहे.