पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या कांद्याने आणले गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:53+5:302021-09-13T04:13:53+5:30

इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध ...

Onions brought from Pakistan, Afghanistan | पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या कांद्याने आणले गोत्यात

पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या कांद्याने आणले गोत्यात

इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने बाजारभावात घसरण होत असल्याचे दिसून आले.

कांद्यास देशांतर्गत उत्तरप्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आदी राज्यांत व परदेशांतही मागणी सर्वसाधारण राहिली होती.

सप्ताहात एकूण कांदा आवक ३१ हजार ३७ क्विंटल झाली असून, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव किमान रु. २५० रुपये ते कमाल १७१२, तर सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक १६ हजार ६५६ क्विंटल झाली असून, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १६००, तर सरासरी १२७५ प्रतिक्विंटलपर्यंत होते.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बाजारभाव किमान ३०० रुपये, कमाल १६२६ रुपये तर सरासरी १२५० रुपये होते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून येत असताना पुन्हा चौथ्या दिवशी बाजारभावात घसरण सुरू झाली. ती सप्ताहअखेरपर्यंत सुरूच राहिली.

सातत्याने होणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे चाळीत साठविलेला कांदा खराब होऊ लागला आहे. चाळीत खराब होण्यापेक्षा आहे तो विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे; तर तालुक्यातील काही भागांत लाल कांद्याची लागवडही सुरू आहे. या दरम्यान, तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक, आदी राज्यांत लाल कांदा बाजारात येऊ लागला असल्याने कांदा बाजारभावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे; तर आहे ते बाजारभाव टिकून राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भुसार बाजारभावातही घसरण

सप्ताहात भुसार धान्याच्या बाजारभावातही घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, मूग, मका यांच्या आवकेत घट झाली आहे. गहू, हरभरा, सोयाबीन, मका यांच्या बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले; तर बाजरी, मूग यांचे बाजारभाव टिकून होते. भुसार धान्यास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिली.

इन्फो

भाजीपाला बाजारभावात घसरण सुरूच

येवला बाजार समितीच्या मुख्य आवारावर टोमॅटोच्या आवकेत घट झाली असून, बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे दिसून आले. टोमॅटोस देशांतर्गत पंजाब, इंदौर, जयपूर, भोपाळ, भुवनेश्वर व दिल्ली, आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण राहिली. सप्ताहात टोमॅटोची एकूण आवक ३५ हजार क्रेट्स झाली असून बाजारभाव किमान ४० ते कमाल २३०, तर सरासरी ८० प्रतिक्रेटप्रमाणे होते. टोमॅटोबरोबरच इतर भाजीपाला पिकांच्या बाजारभावातही सप्ताहात घसरण झाल्याचे दिसून आले.

टोमॅटो पिकाला बाजारात मातीमोल किंमत मिळत असल्याने यातून काढणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने बहुतांशी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आपले पीक उपटून फेकले आहे; तर काहींनी जनावरांपुढे टाकले आहेत. गेल्या सप्ताहात काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावात पीक व्यापाऱ्यांना न देता रस्त्यावर पसरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. सध्या सातत्याने होणारा पाऊस व खराब हवामान यांमुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचा औषधांवरील खर्चही वाढता आहे. त्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादकांकडून या प्रश्नी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे.

कोट....

वाढती महागाई, इंधन दरवाढ याने शेतीखर्चात वाढ झाली आहे. दुसरीकडे कांदा, भाजीपाला पिके यांना बाजारात भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतीपिकांसाठी हमीभाव योजना राबविणे ही काळाची गरज बनली आहे. शेती आणि शेतकरी वाचवायचा असेल तर शासनाने वेळीच निर्णय घेऊन शेती धोरणातही बदल करणे अपेक्षित आहे.

- शिवाजी वाबळे, शेतकरी

Web Title: Onions brought from Pakistan, Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.