किरकोळ बाजारात कांदा ७० रूपये

By Admin | Updated: August 23, 2015 00:03 IST2015-08-22T23:59:23+5:302015-08-23T00:03:46+5:30

ग्राहक हवालदिल : बाजार समितीत क्विंटलला ५७०० रूपये

Onion in retail market Rs 70 | किरकोळ बाजारात कांदा ७० रूपये

किरकोळ बाजारात कांदा ७० रूपये

पंचवटी : काही दिवसांपूर्वी झालेली गारपीट व सध्या पावसाळा असूनही पावसाने दडी मारल्याने कांदाच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे बाजार समितीत विक्रीला येणाऱ्या कांदाचे दर वाढतच असून, शनिवारी कांद्याला ५७०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात ६५ ते ७० रूपये भाव असल्याने कांदा उत्पादन होणाऱ्या जिल्ह्यातच ग्राहक कांदा खरेदी करताना मेटाकुटीस आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव ५ हजार ते साडे सहा हजार रूपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. आगामी कालावधीत कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला असून, कांदा रडवत असल्याचेच आता सर्वसामान्य ग्राहकांचे म्हणण आहे. सध्या बाजार समितीत अत्यल्प आवक असल्याने पंधरवड्यापासून कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. दोन दिवसांपूर्वीच कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाला होता. काही महिन्यांपूर्वी अवकाळी व गारपीट झाल्याने शेतातील उभे कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले होते, तर आता पावसाळा असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने लागवड केलेले पीक धोक्यात आले आहे. बाजार समितीत कळवण, वणी, सिन्नर या भागातून कांदा विक्रीसाठी दाखल होत असून, सध्या केवळ १० टक्क्यांपर्यंतच आवक होत आहे. नवीन कांदामाल दाखल होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी असल्याने व त्यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा माल शिल्लक नसल्याने बाजारभाव गगनाला भिडले आहेत. बाजार समितीत कांद्याला ५७ रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात कांदा ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. एरवी किलो-दोन किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता पावशेर, अर्धा किलो कांदा खरेदीसाठी खिशाचा विचार करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Onion in retail market Rs 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.