कांदा दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांचे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:45 IST2025-03-10T11:43:53+5:302025-03-10T11:45:21+5:30
लाल आणि उन्हाळा कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळत आहेत. त्यामुळे सोमवारी लासलगाव येथे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले.

कांदा दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांचे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन
शेखर देसाई
लासलगाव : सध्या लाल आणि उन्हाळा कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळत आहेत. त्यामुळे सोमवारी लासलगाव येथे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कांदा भावात घसरण होत असून सोमवारी सकाळी निवृत्ती न्याहारकर, गोरख संत, केदार नवले, गणेश निंबाळकर, केशवराव जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी नऊ वाजेच्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेतला. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव घसरत आहेत. कांदा उत्पादकांना कांद्याचा खर्च परवडत नाही. कमी दराने कांदा विक्री होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन गनिमी कावा पद्धतीने आज सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर अचानक जलकुंभावर चढून आंदोलन सुरुवात केले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
लासलगाव येथील पोलिसांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा सुरू केली. लासलगाव बाजार समितीत आज सकाळी २५१ वाहनातील कांदा लिलाव ८०० ते २२०१ सरासरी १७००रुपये भावाने लिलाव झाला. आंदोलनामुळे लिलाव बंद झाले. दरम्यान, विधानसभेमध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न मांडून कांदा उत्पादकांच्या व्यथा सरकारसमोर आणतो असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव भुजबळ यांनी दिल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.