कांदे लागवड मातीत, कपाशीची बोंडं घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:14 IST2018-11-26T16:14:13+5:302018-11-26T16:14:39+5:30
बळीराजा हवालदिल : खरीपाचे उत्पादन केवळ २५ टक्केच हाती

कांदे लागवड मातीत, कपाशीची बोंडं घटली
येवला : कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंडं, मक्याला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाहीत. मूग,सोयाबीन,भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालायं तर कांद्याची मोठ्या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेली रोपे करपून गेली. त्यामुळे येवला परिसरातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून केवळ २५ टक्केच उत्पादन हाती लागले आहे. परिसरातील नदी-नाले,बंधारे कोरडेठाक पडले आहेत.
मुळातच दुष्काळी असलेल्या तालुक्याला आणखी मातीत लोटले आहे. पाऊस नसल्याने पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील पन्नासवर गावात खरिपाचे पीक बरे आहे, पण तेथेही पन्नास टक्क्यांपर्यंत हानी आहेच. अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातील सत्तरवर गावातील चित्र भयानक आहे. गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला थांबवत मक्याचे क्षेत्र या भागात वाढले. पण मका आता केवळ जनावरांच्या चा-यासाठीच शेतात उभी आहे. कारण मक्याला बिटाचे तुरे दिसले पण त्यात दाण्यांचा पत्ताच नाही. सर्वात मोठा फटका कपाशीला जेथे पस्तीस ते चाळीस बोंड असतात त्याच शेतात यंदा चार ते पाच बोंडं लागलेले आहेत.
कांदा लागवड पाण्यात
सोयाबीनसह इतर सर्वच पिकांचा महिनाभरात कडक उन्हाने बळी घेतला आहे. पोळ्याला पाऊस भोळा होतो आणि गणपतीत तर मुसळधार कोसळतो. यामुळे शेतकºयांनी जुगार खेळत लाल कांदयाची लागवड केली पण २५ टक्के क्षेत्र वगळता उर्वरित कांदा लागवड रोपे करपल्याने वाया गेली आहे. तर रब्बीच्या पिकांची शक्यता संपली आहे. पालखेडच्या लाभ क्षेत्रात थोडेफार पिके येतील पण ती सुद्धा हरभरा ज्वारीची व थोडेफार कांद्याचीच!