बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास २१२१ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:06 IST2021-04-13T19:06:25+5:302021-04-13T19:06:49+5:30
उमराणे : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( खारिपाडा ) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या रामेश्वर कृषी बाजारात भाऊसाहेब ...

बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास २१२१ रुपये दर
उमराणे : देवळा तालुक्यातील महात्मा फुलेनगर ( खारिपाडा ) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या रामेश्वर कृषी बाजारात भाऊसाहेब पांडुरंग सूर्यवंशी या शेतकऱ्याने लिलावासाठी आणलेल्या मुहूर्ताच्या बैलगाडीतील उन्हाळ ( गावठी) कांद्यास गजानन आडतचे संचालक संजय देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत २१२१ रुपये दराने कांदामाल खरेदी केला.
तत्पूर्वी व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या हस्ते नवीन बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजारात उमराणे गावापासून अवघ्या दोन ते तीन कि.मी.अंतरावर असलेल्या महात्मा फुलेनगर (खारीपाडा ) येथे खाजगी मार्केटसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने रामेश्वर कृषी बाजारचे संचालक पुंडलिक देवरे व श्रीपाल ओस्तवाल यांनी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व माल विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशस्त जागेत खाजगी रामेश्वर कृषी बाजाराची निर्मिती केली. त्या अनुषंगाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाप्रसंगी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, पं.स.सदस्य धर्मा देवरे, फुलेनगरच्या सरपंच सविता गांगुर्डे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर जाधव, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, पंकज ओस्तवाल, दिलीप नाना देवरे आदींसह कांदा खरेदीदार व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीस हजार क्विंटल कांदा आवक
लिलावासाठी पहिल्याच दिवशी सहाशे ते सातशे ट्रॅक्टर, शंभर पिकअप व पाच बैलगाडीतून सुमारे वीस हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून लाल कांद्यास कमीत कमी ३०० रुपये,जास्तीत जास्त ९०० रुपये तर सरासरी ७०० रुपये तसेच उन्हाळी कांद्यास कमीत कमी ५०० रुपये,जास्तीत जास्त २१२१ रुपये तर सरासरी ८०० रुपये असा बाजारभाव होता. दरम्यान उमराणे येथे स्व निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या बाजार समितीच्या तुलनेत खाजगी रामेश्वर कृषी बाजारात किती आवक होते, किती व्यापारी सहभागी होतात व काय बाजारभाव निघतो याबाबत उमराणेसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता लागून होती.
फुलेनगर येथील खाजगी रामेश्वर कृषी बाजारात मुहूर्ताच्या बैलगाडीचे पूजन करताना व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी व व्यापारी, तसेच दुसऱ्या छायाचित्रात बाजार आवारात कांदा विक्रीसाठी झालेली गर्दी. (१३ उमराणे १/२)