कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

By Admin | Updated: July 28, 2016 00:06 IST2016-07-27T22:54:25+5:302016-07-28T00:06:23+5:30

व्यापाऱ्यांनो, गोण्या परत द्याल का?

Onion Auction Method: Farmers question in the district | कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

कांदा लिलाव पद्धत : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल

नाशिक : शेतकऱ्यांनी ४५ किलोच्या गोण्यांमध्ये कांदा भरून बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणावा, अशी अट जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी घातली आहे. पण धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे कांदा व्यापारी शक्यतो हुक न लावता कांद्याच्या गोण्या त्यांच्या खळ्यावर उतरवून घेऊन शेतकऱ्यांना रिकाम्या गोण्या परत करतील का, असा प्रश्न जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत.
व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची अडत शेतकऱ्यांकडून वसुल केली जाऊ नये आणि फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला. काही ठिकाणी व्यापऱ्यांनी तीन,चार दिवसांत संप मागे घेतला तर नाशिक जिल्ह्यात तब्बल २० दिवस कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरुच होता. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तजविज म्हणून चाळींमध्ये साठविलेला कांदा सडु लागला. शासनाने अडत बंदीचा निर्णय तर घेतला पण पर्यायी व्यवस्था निर्माण न केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला.
व्यापाऱ्यांच्या संपामुळे शासनाने आपल्या निर्णयाचा पुर्णविचार करण्यासाठी समिती गठीत केली ही समिती ६ आॅगस्टला अडत धोरणाबाबत आपला निर्णय देणार आहे. तोपर्यंत कांदा लिलाव बंद न ठेवता प्रायोगिक तत्वावार ४५ किलोच्या गोणी पध्दतीने कांदा खरेदी करण्याचा निर्णय मनमाड येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गोणीच्या निर्णयामुळे ‘आगीतुन फुफाट्यात पडल्याची ’ भावना शेतकऱ्यांची झाली आहे. एकुण मालाच्या चार टक्के दराने कापली जाणारी अडत आणि गोणीचा खर्च यांचा विचार करता दोन्ही पध्दतीत शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ज्युटची (बारदान) एक गोणी साधारणत: २८ ते ३० रुपयांना एक या प्रमाणे शेतकऱ्याला खरेदी करावी लागते. योग्य पध्दतीने हाताळणी केल्यास एक गोणी किमान दोनदा तरी वापरता येवु शकते याचा विचार केल्यास कांदा व्यापाऱ्यांनी धान्य व्यापाऱ्यांप्रमाणे लिलावानंतर आपल्या खळ्यावर हुक न लावता कांदा ओतुन घेउन रिकाम्या गोण्या शेतकऱ्यांना परत केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा पुर्णवापर करता येऊ शकतो अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Onion Auction Method: Farmers question in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.