Onion auction closed as soon as prices fall in Pimpalgaon | पिंपळगावी दर घसरताच कांदा लिलाव बंद

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देक्विंटलमागे २२०० रुपयांची घसरण : शेतकऱ्यांमध्ये संताप

पिंपळगाव बसवंत : कांदा निर्यातबंदीत शिथिलता आणि व्यापाऱ्यांवर फक्त दोनच टन कांदा साठवणुकीचे निर्बंध आणल्याच्या निर्णयानंतर शनिवारी (दि. २४) पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा दरात क्विंटलमागे २२०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आपला संताप व्यक्त केला.

केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदीत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. लगोलग व्यापाऱ्यांवर केवळ दोन टन कांदा साठवणुकीच्या निर्णय घतला त्यामुळे शनिवारी दरात २२०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रातील कांदा लिलाव बंद पाडले. शुक्रवारी (दि.२३) जास्तीत जास्त ८२८२ रुपये प्रतिक्विंटल कांदा पुकारला असता केंद्र सरकारच्या निर्यातबंदी शिथिलतेच्या निर्णयामुळे कांदा दरात घसरण झाली.
सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त ६१४०, सरासरी ४७००, तर कमीत कमी २००० रुपयांचा दर मिळाला. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, दुपारच्या सत्रात कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. बाजार समिती संचालक नारायण पोटे, पिंपळगावचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्याने शेतकऱ्यांनी लिलावास संमती दिली. मात्र ज्या शेतकऱ्यांना आहे त्या दरात कांदा द्यायचा असेल त्याच शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. दुपारच्या सत्रात ७४५२ रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
शुक्रवारचे दर
कमीत कमी - ३०००, जास्तीत जास्त ८२८२, सरासरी ६९०१.

शनिवारचे दर
सकाळ सत्रात कमीत कमी २०००, सरासरी ४७००, जास्तीत जास्त ६१४०. तर दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त ७४५२ दर मिळाला.

Web Title: Onion auction closed as soon as prices fall in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.